महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ नोव्हेंबर – मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूडाने कारवाई करत नाही एका आर्किटेक्टच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा सरकारचा किंवा राजकीय पक्षाचा संबंध असल्याचे काही नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. येथे सर्वकाही कायद्यानुसार केले जाते. अर्णब गोस्वामीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याचा ठाकरे सरकारशी कोणताही संबंध नाही’ तसेच पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘मुंबई पोलिस कुणावर अन्याय करत नाहीत, कुणावर सूडाने कारवाई करत नाही. त्यामुळे जर कोणी गुन्हा केला असेल आणि तो दडपला असेल तसेच त्यासंदर्भातील काही तपासाचे, पुराव्यांचे धागेदोरे हाती आल्यानंतरच पोलिसांनी कारवाई केली असेल.’ असे म्हणत त्यांनी या कारवाईचे समर्थन केले आहे. संजय राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते.