केंद्राकडून शालेय दप्तरविषयक धोरण जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १० डिसेंबर – शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनावरून वारंवार होणारे वाद केंद्र सरकारने सध्यातरी संपुष्टात आणले आहेत. यासंबंधी केंद्र सरकारने नवे बॅग (दप्तर) धोरण जाहीर केले आहे. यानुसार शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही.

या धोरणाअंतर्गत इयत्ता पहिलीत शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनाची सरासरी 1.6 ते 2.2 किलोग्रॅम निश्चित करण्यात आली आहे तर बारावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन आता सरासरी 3.5 ते 5 किलो ग्रॅमदरम्यान असणार आहे. तर प्राथमिकपूर्व शिकत असलेल्या मुलांसाठी कुठलेच दप्तर नसणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्या शैक्षणिक सत्रापासून यावर कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुलांच्या दप्तराचे वजन तपासण्यासाठी शाळांमध्ये वजनमापक ठेवण्यात येणार आहे. प्रकाशकांना आता पुस्तकांच्या मागे त्याचे वजनही नमूद करावे लागणार आहे. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी एकूण 3 पुस्तके असतील, ज्यांचे एकूण वजन 1,078 ग्रॅम असणार आहे.

तर बारावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांसाठी एकूण 6 पुस्तके असणार आहेत, ज्यांचे एकूण वजन 4182 ग्रॅम निर्धारित करण्यात आले आहे. शिक्षणासाठी वेळापत्रकही तयार करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय समिती नियुक्त केली होती. विस्तृत सर्वेक्षणानुसार समितीने यासंबंधीच्या दिशानिर्देशांना अंतिम स्वरुप दिले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या वजनावरून विविध न्यायालयांकडून वेळोवेळी दिशानिर्देश देण्यात आले होते.

वजनानुसार असणार दप्तरात वस्तू…

शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात पुस्तकांचे वजन 500 ग्रॅम ते 3.5 किलोग्रॅम राहणार आहे. वहय़ांचे वजन 200 ग्रॅम ते 2.5 किलोग्रॅम राहणार आहे. याचबरोबर जेवणाच्या डब्याचे वजनही 200 ग्रॅम ते 1 किलो ग्रॅमदरम्यान असेल. तर पाण्याच्या बाटलीचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलोदरम्यान असेल. सद्यस्थितीत दप्तराचे एकूण वजन विद्यार्थ्याच्या वजनाच्या 10 टक्केच असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *