वर्षभरात बालभारतीतर्फे स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल : शालेय शिक्षणमंत्री

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि. २८ । पुणे । विद्यार्थ्यांसाठी बालचित्रवाणीतील चांगले शैक्षणिक साहित्य पुनरुज्जीवित करून त्याचा वापर केला जाणार आहे. तसेच वर्षभरात बालभारतीतर्फे स्वत:चे शैक्षणिक चॅनेल सुरू केले जाईल, अशी घोषणा राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री गायकवाड यांनी केली. तसेच येत्या १ फेब्रुवारीपासून तज्ज्ञ शिक्षकांकडून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा व अभ्यासक्रमाबाबत समुपदेशन करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) संस्थेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त व किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक दिनकर पाटील,समन्वयक विवेक गोसावी,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्लास पवार,कवी इंग्रजीत भालेराव आदी उपस्थित होते.

गायकवाड म्हणाल्या, महापालिका, नगरपालिकेच्या व जिल्हा परिषदेच्या शाळेतील प्रवेशासाठी रांगा लागतात. शिक्षण विभागातर्फे याबाबतची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. तसेच राज्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्हिडिओ कॉन्फन्सिंगच्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात. शिक्षण विभागाने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती व विषय शिक्षकांकडून या विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे.

शाळा कोरोना काळात बंद असल्या तरी शिक्षण सुरू ठेवले. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे प्रत्यक्षात वर्गात जाऊन शिक्षण घेता आले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे यु-ट्युब-फेसबुक लाईव्ह आदी साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व समुपदेश करण्यासाठी 426 तज्ज्ञ समुपदेशक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *