पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेले तर काय कराल? जाणून घ्या प्रक्रिया

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। पुणे । बँकर्सच्या म्हणण्यानुसार, असं घडल्यास स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजरनुसार (SOP) तातडीने कार्यवाही सुरू होते. चुकून रक्कम ज्यांना पाठवली गेली आहे, त्यांना बँकेकडून लगेच याची माहिती दिली जाते आणि पैसे शक्य तितक्या लवकर परत पाठवण्याची विनंती केली जाते. पैसे ज्यांना मिळाले आहेत, त्यांनी तसं करण्यास नकार दिला, तर बँक पुढील कार्यवाहीसाठी कायदेशीर सल्ला मागवते. पोलिसांकडे तक्रार दाखल केली जाते किंवा कोर्टात याचिका दाखल केली जाते. मुंबईतल्या एका आघाडीच्या खासगी बँकेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती एका वृत्तवाहिनीला दिली .

काही वेळा ग्राहकाकडून ऑनलाइन व्यवहार करताना बेनेफिशियरी डिटेल्समध्ये (Beneficiary details) चूक होते. त्यामुळे पैसे भलत्याच व्यक्तीच्या खात्यात जातात. अशा वेळी बँक कोणतीही जबाबदारी घेत नाही. कारण चूक ग्राहकाची असते. असं घडल्यास पैसे चुकून ज्या खात्यात गेले आहेत, त्या खातेदाराशी संपर्क साधून ते परत पाठवण्याची विनंती करावी लागेल. त्या व्यक्तीकडून सहकार्य न मिळाल्यास कायद्याची मदत घ्यावी लागते.असे प्रकार टाळण्यासाठी ग्राहकाने व्यवहार करताना बेनिफिशियरी डिटेल्स बारकाईने तपासावेत आणि मगच व्यवहार करावेत, असं बँकर्सचं म्हणणं आहे. बेनिफिशियरी डिटेल्स अचूकपणे टाकणं ही ग्राहकाची जबाबदारी आहे, असं बंधन बँकेनं ई-मेलने पाठवलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

बंधन बँकेच्या म्हणण्यानुसार, आरटीजीएस (RTGS), एनईएफटी (NEFT), आयएमपीएस (IMPS), यूपीआय (UPI) अशा सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये बँक खाते क्रमांकाच्या आधारे स्ट्रेट थ्रू प्रोसेसिंग (STP) केलं जातं.

‘पैसे पाठवणाऱ्या ग्राहकाकडून चुकीच्या खात्यात पैसे पाठवले गेले, तर संबंधित ग्राहकाची विनंती आल्यानंतर पैसे पाठवणारी बँक ग्राहक सेवेचा भाग म्हणून समोरच्या बँकेकडे हे कारण देऊन हे पैसे परत पाठवण्याची विनंती करू शकते,’ असं बंधन बँकेकडून सांगण्यात आलं.ज्या खातेदाराच्या खात्यात पैसे चुकून पाठवले गेले आहेत, ते पैसे खात्यात असतील तर त्याची बँक ते पैसे व्यवहार सुरू करणाऱ्या खातेदाराच्या खात्यात पुन्हा पाठवू शकते; पण खातेदाराचं नाव आणि खाते क्रमांक जुळत असतील किंवा संबंधित व्यवहारात काहीही चूक नाही असं वाटलं, तर संबंधित बँक पैसे परत पाठवत नाही. पैसे परत पाठवायचे झालेच, तर संबंधित खातेदाराची परवानगी घेऊनच ते मागे पाठवले जातात, असंही बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं.

पैसे चुकीच्या बँक खात्यात पाठवले गेल्यास काय करायचं, याबद्दल भारतीय रिझर्व्ह बँकेचे नेमके नियम नाहीत. तरीही अशी चूक घडल्यास संबंधित ग्राहक तातडीने आपल्या बँकेशी संपर्क साधू शकतो. बँकेने त्यावर कार्यवाही न केल्यास ग्राहक बँकिंग ओम्बड्समनकडे दाद मागू शकतो.तुमच्या खात्यात चुकून कोणाचे पैसे जमा झाले असतील, तर तात्त्विकदृष्ट्या त्या पैशांवर तुमचा काहीही अधिकार नसतो. चूक लक्षात आल्यावर तुम्ही तातडीने ते ज्याचे कोणाचे असतील, त्याला परत करायला हवेत.

बँकेने पैसे पाठवताना चूक झाल्याच्या घटना दुर्मीळ आहेत. 2012-13मध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या एका आघाडीच्या बँकेकडून (PSU Bank) चुकून अनेक खात्यांमध्ये व्याजाचे पैसे जमा केले गेले. चूक लक्षात आल्यानंतर ते पैसे परत घेतले गेले. ही चूक त्या दिवशी संध्याकाळी उशिरा घडली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चूक लक्षात येऊन ती सुधारली गेली होती. त्यामुळे कोणताही तोटा झाला नाही. त्या वेळी त्या बँकेत कार्यरत असलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *