महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। चंदीगढ । हरियाणातील रेवाडी येथील हार्दिक कुमार या अवघ्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थ्याने व्हॉटस् अॅपला पर्याय ठरू शकेल असे अॅप विकसित केले आहे. त्याने या अॅपला ‘बीटल’ असे नाव दिले असून त्यामध्ये ‘व्हॉटस् अॅप’सारख्या सर्व सुविधा मिळू शकतात. हरियाणाचे तंत्रज्ञान शिक्षणमंत्री अनिल वीज यांनी हार्दिकचे अभिनंदन केले असून त्याला शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
हार्दिक कुमार रेवाडीच्या केम्ब्रिज स्कूलमध्ये नववीच्या वर्गात शिकतो. हार्दिकला भेटल्यानंतर वीज यांनी सांगितले की त्याने बनवलेले बीटल सोशल अॅप गुगल प्ले स्टोअरवर आहे. त्यामध्ये व्हॉटस् अॅपप्रमाणेच डॉक्युमेंट, व्हिडीओ, ऑडिओ, फोटो, कॉन्टॅक्ट नंबर, पीडीएफ शेअर करण्याची सुविधा आहे. तसेच मोफत ऑडिओ-व्हिडीओ कॉलिंगचीही सुविधा आहे. हार्दिकने सांगितले की बीटल अॅप प्रायव्हसीच्या बाबतीतही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामधील संदेश व कॉल कोणत्याही तिसर्या पक्षाद्वारे अॅक्सेस केले जाऊ शकत नाहीत.