विमान प्रवाशांवर कडक निर्बंध ; नियमांचे पालन न केल्यास संबंधितांची विमानातून हकालपट्टीही होऊ शकते.

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ मार्च ।मुंबई । गेल्या काही दिवसात कोरोना संसर्ग बाधितांचा आकडा वाढत असल्याने केंद्र सरकार चिंताग्रस्त झाले आहे. संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षितता आणि सावधानतेची नियमावली पाळण्याचे आदेश वारंवार सरकारकडून दिले जात आहेत. तरीही काही लोक गाफीलपणे वावरत असल्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका संभवत आहे. त्याच अनुषंगाने नियम पाळण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. विशेषतः विमान प्रवाशांसाठी ‘डीजीसीए’कडून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यानुसार मास्कचा वापर योग्य प्रकारे करण्याबरोबरच सोशल डिस्टन्स पाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकेच नाहीतर नियमांची पायमल्ली केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे.

विमानप्रवास करणाऱया प्रवाशांसाठी काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. नियमांचे पालन न केल्यास संबंधितांची विमानातून हकालपट्टीही होऊ शकते. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, पण जर कोणीही विमानात योग्य पद्धतीने मास्क वापरताना आढळले नाही, किंवा तो चुकीच्या पद्धतीने केल्यास प्रवाशांना थेट विमानातूनच उतरवण्यात येणार आहे.

‘डीजीसीए’कडून ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये नियमांचे पालन न करणाऱया प्रवाशांना शिक्षेला सामोरे जावे लागेल असे नमूद करण्यात आले आहे. हनुवटीवर किंवा कोणत्याही चुकीच्या प्रकारे मास्क घातलेले प्रवासी दिसल्यास त्यांना तात्काळ विमानातून बाहेरची वाट दाखवावी, असे निर्देश यापूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने एका आदेशाद्वारे दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा इशारा ‘डीजीसीए’ने दिला आहे.

मागील काही काळापासून प्रतिबंधात्मक नियमांची रिघ सर्वांच्याच मागे लागली आहे. याच धर्तीवर कोरोनापासून दूर राहण्यासाठी प्रशासनाकडून अनेक कठीण निर्बंध लागू करण्यात येत आहेत. कोरोनाचा देशात शिरकाव होण्याच्या घटनेला जवळपास वर्षभराचा काळ उलटून गेला. त्यातच मागील काही महिन्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत असतानाच पुन्हा एकदा या संसर्गाने डोके वर काढले. नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा हा आकडा पाहता, अनेक भागांमध्ये लॉकडाऊनही लागू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *