महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. ३१ मार्च । मार्चअखेर राज्यात उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह जळगाव, सोलापुरात पारा चाळिशीपार पोहोचला आहे. विदर्भात या आठवड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. होळीच्या सणापासूनच यंदा सूर्याची होळी सुरू झाली आहे. परिणामी चंद्रपूर येथे मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
मध्य व दक्षिण महाराष्ट्रात चक्रीय वाऱ्यांची स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात २ दिवसांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. हिंदी महासागर व अरबी समुद्रातही कमी दाबाच्या क्षेत्रास अनुकूल स्थिती आहे. परिणामी राज्यात उष्णता वाढू शकते. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तापमान २ ते ४ अंशांनी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे वेधशाळे नुसार, ३१ मार्च ते २ एप्रिल या काळात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात या काळात हवामान कोरडे राहील व कमाल तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर येथे मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ४३.६ अंश तापमानाची नोंद झाली. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत पारा चाळिशीपार गेला. मराठवाड्यातील कमाल तापमान ३ ते ४ अंशांनी वाढले आहे. प्रमुख शहरांचे मंगळवारचे कमाल तापमान – अकोला ४१.७, अमरावती ४२.२, औरंगाबाद ३९.६, बुलडाणा ४१.०, चंद्रपूर ४३.६, जळगाव ४०.५, कोल्हापूर ३५.५, महाबळेश्वर ३०.५, मालेगाव ४२.०, मुंबई ३२.६, नागपूर ४१.९, नांदेड ४०.०, नाशिक ३५.८, परभणी ४०.५, पुणे ३६.५, सांगली ३६.९, सोलापूर ४०.२, वर्धा ४२.२, यवतमाळ ४१.७ अंश सेल्सि.