महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. १ एप्रिल । भविष्यात रुग्णसंख्येत वाढ होऊन ऑक्सिजनची गरज वाढेल, ही बाब लक्षात घेता ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्याचे दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन असूनही तो कोरोना बाधित रुग्णांना उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राज्यात पुरेसे ऑक्सिजनचे उत्पादन होऊनही योग्य वितरण होत नसल्यामुळे काही ठिकाणी तुटवडा भासत आहे. तसेच, रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा अखंडितपणे सुरु राहण्यासाठी जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात दररोज १३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून, उत्पादकांकडे ७९० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे समितीने कोणत्याही रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्हास्तरीय समितीची कार्ये :
जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियंत्रण कक्षाला ऑक्सिजन पुरवठ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, समितीने बॉटलिंग प्लांट्स बल्क सप्लायर्स यांच्या संपर्कात राहून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सिजन प्राप्त होईल, याची दक्षता घ्यावी.
पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : दूरध्वनी क्रमांक ०२०- २६१२३३७१
एफडीए नियंत्रण कक्ष : दूरध्वनी क्रमांक ०२२- २६५९२३६४
टोल फ्री क्रमांक – १८००२२२३६५