मुख्यमंत्री आज संवाद साधणार : जनसंवादामध्ये लाॅकडाऊनची घोषणा करणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । मुंबई । कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही लोक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत असल्याने राज्यात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्याचा एकमुखी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी लाॅकडाऊनची एकमुखी मागणी केली. राज्यव्यापी लाॅकडाऊमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध टाकण्यात येणार आहेत. जिल्हाबंदीसुद्धा केली जाऊ शकते तसेच मुंबईची लोकल केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी राज्याला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री त्या जनसंवादामध्ये लाॅकडाऊनची घोषणा करतील, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन करावा, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी बैठकीत मांडली. या बैठकीला राज्यमंत्र्यांना बोलवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कितीही खर्च येवो, पण लवकरात लवकर राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. राज्य सरकारच्या मालकीचा किमान शंभर टन क्षमतेचा आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तातडीने स्थापन केला पाहिजे, अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली.

कोरोना रुग्णांना सोयीसुविधा पुरवण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याने सरकारविरोधात संताप वाढतो आहे. त्यामुळे बिथरलेल्या मंत्र्यांनी लाॅकडाऊनचे हत्यार उपसून काहीशी उसंत मिळवण्याचा बैठकीत प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनचा कालावधी नेमका कधीपर्यंत असेल याबाबत संभ्रम आहे.

किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी सकाळी फक्त ४ तास उघडे
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्यपदार्थांची सर्व दुकाने, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *