महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २६ मे । ॲलोपॅथी उपचार पद्धती व डॉक्टरांवर टीका करणे योगगुरु रामदेवबाबा यांना महागात पडले आहे. रामदेवबाबा यांनी आपल्या वादग्रस्त विधानाबाबत १५ दिवसांमध्ये लेखी माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात एक हजार कोटींचा अब्रुनुकसानीची दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) उत्तराखंड शाखेने पाठवली आहे.
योगगुरु रामदेवबाबांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूला ॲलोपॅथी उपचार पद्धती व डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याविरोधात ॲलोपॅथी डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनीही रामदेवबाबांनी तत्काळ विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली होती.
योगगुरु रामदेव बाबा यांच्यावर ठोस कारवाई करण्यात यावी, अशी मागणी डॉ. खन्ना यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्याकडे पत्राव्दारे केली होती. दरम्यान, ॲलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त विधान रामदेवबाबांनी मागे घेतले होते. मात्र यानंतर त्यांनी आयएमएला २५ प्रश्न विचारले होते. या प्रश्नांचे पत्रक सोशल मीडियावर शेअरही केले होते.