महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । यंदाच्या ऑगस्ट महिन्यात राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामुळे 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनापूर्वी सर्व शालेय शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राज्यांना दिले आहेत. देशातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे. रुग्णसंख्या देखील कमी झाली असून केरळ वगळता इतर राज्यांमध्ये परिस्थिती सामान्य झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यांनी शाळा पुन्हा उघडण्यास परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्या तरी लसीअभावी अनेक शिक्षकांचे लसीकरण रखडले आहे. त्यामुळे शिक्षकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आरोग्य तज्ञांनी तिसऱया लाटेचा इशारा दिलेला आहे, त्यातच कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात असलेल्या भागात सरकारने शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.