महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । देशात कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरली आहे, तरी तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. देशात लसीकरणाने वेग घेतलेला असून आतापर्यंत जवळपास 60 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना सूचना केल्यात की, ज्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना राज्यातील प्रवेशादरम्यान निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट मागू नये. असे असले तरी दुसऱ्या राज्यांत जाणाऱ्या प्रवाशांना कोरोनावरील लशीचा दुसरा डोस घेऊन 15 दिवस उलटलेले असणे अनिवार्य आहेत. (National Latest news)
आरोग्य मंत्रालयाने राज्यांसाठी नव्या गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत. यानुसार, दुसऱ्या राज्यातून आलेल्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलेले असतील तर त्यांना निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक नाही. पण, त्यांनी दुसरा लस घेऊन 15 दिवस झालेले असणे आवश्यक आहे. याशिवाय दोन डोस घेतलेल्या नागरिकांची राज्यातील प्रवेशावेळी RAT टेस्ट न करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
लस घेतलेल्यांनी आपल्याजवळ Co-WIN पोर्टलवरुन डाऊनलोड केलेलं सर्टिफिकेट ठेवणे आवश्यक आहे. हवाईमार्ग, रस्त्याने, रेल्वेने किंवा जलमार्गाने देशांतर्गत प्रवास करताना कोणतेही निर्बंध असणार नाहीत. नुकतेच झारखंड, छत्तीसगड आणि त्रिपूरा या राज्यांनी दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RTPCR रिपोर्ट दाखवणे बंधनकारक केले होते. पश्चिम बंगाल, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी काही विशिष्ठ ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध आणले होते. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.