महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । कोरोनाचा फटका बसलेल्या एस.टी. महामंडळाचा गाडा अद्याप सुरळीत झालेला नाही. उत्पन्नात घट होऊन तिजोरीत खडखडाट झाल्याने वेतनाचा प्रश्न गंभीर होत आहे. एस.टी. कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या सात तारखेला होते; पण २५ तारीख उलटली तरी जुलैचे वेतन एस.टी. कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. ऑगस्ट महिना संपायला आलेला असताना वेतन अदा न झाल्याने अनेक कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
राज्य शासनातर्फे सवलत मूल्यापोटी प्रतिपूर्तीची रक्कम महामंडळाला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. गेले दीड वर्ष बहुतांश वेळा वेतनास विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून मनस्ताप व्यक्त होत आहे. त्यातच ऑगस्ट महिना संपायला आलेला असताना अद्याप जुलैचे वेतन मिळालेले नाही. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवापूर्वी वेतन अदा केले जाते की काय, अशी चर्चा सुरू आहे. जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्यांचे एकत्रित वेतन अदा केले जाण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.