कोळ्याला देव पावला ; कोटींचे घोळ मासे अडकले मच्छिमाराच्या जाळ्यात,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑगस्ट । नारळी पौर्णिमेनंतर मच्छिमाराचं नशीब उजळलं आहे. ही घटना पालघरच्या मुरबे गावात घडली. मासेमारी करायला गेलेल्या चंद्रकांत तरे यांच्या जाळ्यात किंमती मासे आले. एक दोन नाही तर 18 ते 25 किलोचे मासे सापडले आहेत. घोळ जातीचे दीडशेहून अधिक मासे सापडल्याने या मच्छिमाराचं नशीब पालटलं आहे. या माशांना सोन्यासारखी किंमत बाजापेठेत मिळाली.

मच्छिमारीला गेलेल्या चंद्रकांत तरे यांच्या लक्षात आलं की आपलं जाळं जड होत आहे. त्यांनी जाळं ओढून बोटीत घेतलं आणि त्यांच्या हाती घोळ मासे आले. घोळ माशांमुळे मच्छिमारांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. या माशांना दीड कोटींहून अधिक बोली लावून खरेदी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गावाची चर्चा होत आहे.

मुरबे गावातील श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या जाळ्यात आधी घोळ मासा अडकला होता. त्याची किंमतही साडेपाच लाखाहून अधिक होती. या घोळ माशानं या गावातील मच्छिमारांचं नशीब पालटल्यानं गावात चर्चा आहे.

घोळ माशांच्या पोटातील पिशवीला (बोत) विशेष महत्त्व आहे. त्यामुळे हे दुर्मीळ मासे लाखे रुपयांना विकले जातात. यांच्या किंमतीची बोली लागते. त्याचा वापर वैद्यकीय उपचारासाठी देखील केला जातो असंही सांगितलं जातं. जाळ्यात सापडलेल्या माशांचं वजन साधारण 18 ते 25 किलो असावं असं सांगितलं जात आहे. हा मासा सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, हाँगकांग अशा देशांमध्ये पाठवला जातो. घोळ जातीच्या सर्वात लहान माशाची किंमत 8 ते 10 हजार रुपये आहे.

घोळ मासा कसा असतो आणि नेमका त्याला कसं कापलं जातं याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर आहे. हा व्हिडीओ पालघरमधील नाही मात्र या व्हिडीओद्वारे घोळ मासा नेमका दिसतो कसा याची माहिती मिळू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *