एका मागोमाग एक हॉलिवूडपटांच्या प्रदर्शनाची घोषणा ; ‘हे’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ सप्टेंबर । करोनाचं संकट पूर्णपणे टळलं नसलं तरीही मनोरंजनसृष्टीनं आता थांबायचं नाही असा निश्चय केलेला दिसतोय. कारण सध्या एका मागोमाग एक हॉलिवूडपटांच्या प्रदर्शनाची घोषणा होत आहे. ही बाब हॉलिवूडप्रेमींसाठी आनंददायी आहे. ‘ब्लॅक विडो’, ‘द क्वाइट प्लेस २’, ‘द सुसाइड स्क्वॉड’, ‘फास्ट ९’ या चित्रपटांना अभूतपूर्व यश मिळालं. यामुळे चित्रपट व्यवसायाला करोनामुळे बसलेल्या फटक्याची परिणामकारकता थोडीशी कमी झाली, असं म्हटलं जातंय. करोनाचं सावट असलं तरीही चित्रपटांना सिनेमागृहात चांगलंच यश मिळत आहे, हे ‘क्रूएला’, ‘द काँज्युरिंग ३’, ‘स्पेस जॅम लिगसी’ या चित्रपटांनीसुद्धा दाखवून दिलं.

वर्षाच्या सुरुवातीला हॉलिवूड चित्रपटाच्या प्रदर्शनाला सुरुवात झाली. त्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढणं साहजिक आहे. आता वर्षातील उरलेल्या काही महिन्यांवर प्रेक्षकांची नजर आहे. नुकतंच प्रदर्शित झालेल्या ‘शांग ची अँड लेजंड ऑफ टेन रिंग्स’ या चित्रपटाने दोन दिवसांत आठ अब्ज डॉलर्सची कमाई करुन बॉक्स ऑफिस दणाणून सोडला. तसंच या चित्रपटानं मार्व्हलच्या आगामी चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट मोकळी करुन दिली आहे. येत्या काळात अनेक मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. वर्षाच्या अखेरीस ‘डुन’, ‘व्हॅनम-लेट देअर बी कार्नेज’, ‘हॅलोवीन किल्स’, ‘इटर्नल्स’, ‘फिंच’, ‘गोस्टबस्टर’, ‘टॉप गन मेव्हरीक’, ‘किंग्स मेन’, ‘स्पायडरमॅन नो वे होम’, ‘जेम्स बाँड नो टाइम टू डाय’, ‘वेस्ट साइड स्टोरी’ हे बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यातील काही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा वारंवार बदलल्या गेल्या. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. पण यातूनही मार्ग काढत प्रेक्षकांना खुश ठेवण्याची कला हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना अवगत आहे.

जगभरात चित्रपट प्रदर्शित होत असताना भारतातील चित्र काहीसं वेगळं आहे. करोनाच्या पहिल्या लाटेमुळे चित्रपटगृहं बंद होती. पण लाट ओसरल्यावर थोडे दिवस सिनेमागृहं खुली झाली होती. तेव्हा मोजक्या सिनेमागृहांत हॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेमागृहात चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही महिन्यांनंतर हे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आणले गेले. जेणेकरुन, भारतीय प्रेक्षकांना हॉलिवूडपट पाहता यावेत. याची ‘क्रूएला’ आणि ‘ब्लॅक विडो’ ही दोन उदाहरणं आहेत. सिनेमागृहांसह ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरसुद्धा चित्रपट प्रदर्शनाचा सपाटा सुरू आहे. ‘रेड नोटीस’ हा बहुचर्चित आणि आतापर्यंत सर्वात जास्त निर्मितीखर्च झालेला चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ओटीटी माध्यम प्रभावी असलं तरीही चित्रपट हा सिनेमागृहांतच प्रदर्शित व्हावा, असा आग्रह हॉलिवूड दिग्दर्शकांचा आहे. त्यात ख्रिस्तोफर नोलन, जॉई रुसो, अँथनी रुसो, स्टीव्हन स्पिलबर्ग, क्वान्टीन टेरेटींनो या नामवंत दिग्दर्शकांचा समावेश होतो.

करोनाच्या काळात हॉलिवूडने तब्बल ३२ दशलक्ष डॉलर्सचा तोटा सहन केला. करोनाच्या पहिल्या लाटेतून सावरल्यानंतर चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झालं. पण त्याला दुसऱ्या लाटेमुळे ब्रेक लागला. त्यानंतर पुन्हा योजना आखून चित्रीकरणाला सुरूवात झाली. पण यामुळे खर्च कैक पटीनं वाढला. परिणामी, हॉलिवूडचं झालेलं नुकसान दशलक्षाच्या घरात गेलं. पण पुढील वर्षी प्रेक्षकांना या वर्षापेक्षा दुप्पट हॉलिवूड चित्रपट सिनेमागृहांत पाहायला मिळणार आहेत. हॉलिवूड चित्रपट निर्मात्यांनी आणि मोठमोठ्या स्टुडिओजनी पुढच्या वर्षीची जय्यत तयारी करून ठेवली आहे. २०२२मध्ये ‘मिशन इम्पॉसिबलचा ७वा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणाची सर्वत्र चर्चा आहे. तसंच मार्व्हलचे ‘डॉक्टर स्ट्रेंज २’, ‘थॉर-लव्ह अँड थंडर’, ‘ब्लॅक पँथर-वकांडा फॉरेव्हर’, ‘द मार्व्हल्स’, ‘अँट मॅन अँड वास्प क्वांटममेनिया’ हे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. तर डिसीचे ‘ब्लॅक अॅडम’, ‘शझम’, ‘फ्लॅश’, ‘बॅटमॅन’ हे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. या व्यतिरिक्त ‘जुरासिक वर्ल्ड डोमियन’, ‘मिनियन्स २’, ‘अवतार २’, ‘अनचार्टेड’ हे बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याला जगभरातील प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *