महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासांमध्ये अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे राज्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता निर्माण झाली आहे. पालघर, ठाणे येथे सोमवार, मंगळवारी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमधील घाट परिसर येथे ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवारी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे त्याची तीव्रता थोडी अधिक असू शकते. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवार ते मंगळवार या तीन दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र होऊन ते पश्चिम- वायव्य दिशेने प्रवास करत असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम किनारपट्टी, मध्य भारत येथे पावसाचा जोर रविवारपासून वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच ईशान्य अरबी समुद्र ते पूर्व-मध्य बंगालचा उपसागर या भागांमध्ये ढगांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती पुढील तीन-चार दिवस मध्य भारतावर कायम असेल. यामुळेही मध्य भारतात पाऊस असेल, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मुसळधार पावसाची शक्यता
सिंधुदुर्गातही मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळ्यामध्ये सोमवार-मंगळवारी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
घाट परिसरातही मुसळधार?
नंदुरबार, जळगावमध्ये मंगळवारी ही स्थिती असू शकेल. मध्य महाराष्ट्रात पुण्यातील घाट परिसरासाठी बुधवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील घाट परिसरासाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. या काळात तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यात सोमवार, मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. सोमवारी जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे त्याची तीव्रता थोडी अधिक असू शकते. विदर्भातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अमरावतीमध्ये सोमवारी तर गोंदियामध्ये मंगळवार, बुधवारी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथे सोमवारी आणि गुरुवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर थोडा वाढू शकेल. गोंदियामध्ये बुधवारपर्यंत मुसळधार ते तीव्र मुसळधार पाऊस पडू शकेल. वर्धा, यवतमाळ येथेही सोमवारी पावसाची जोर वाढण्याची शक्यता आहे. यामुळे तुरळक ठिकाणी पाणी साचू शकते तसेच कच्च्या रस्त्यांचेही नुकसान होऊ शकते.