महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । आज काल वजन कमी करण्याचा विचार केला की, काय खावं आणि काय खाऊ नये याच्याबद्दल काथ्याकूट सुरू होतो. स्थूलपणा कमी करण्यासाठी निगेटिव्ह कॅलरीयुक्त (Negative Calorie) आहार घेणं फायद्याचं असतं, असं आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. याच्यामुळं पचन सुधारण्यासाठी आणि चयापचय वाढविण्यासाठी मदत होते. दररोज नकारात्मक कॅलरी असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. नकारात्मक कॅलरीयुक्त अन्न म्हणजे काय आणि वजन कमी करण्यासाठी ते कसं उपयुक्त (negative calorie foods health benefits) ठरतं, हे जाणून घेऊ.
निगेटिव्ह कॅलरीज (Negative Calorie) असलेलं अन्न पचनाच्या वेळी शरीराला ऊर्जा पुरवणाऱ्या पदार्थांपेक्षा जास्त ऊर्जा वापरतात. म्हणजेच अन्न पचवण्याचा उष्मांक खर्च त्याच्या ऊर्जा सामग्रीपेक्षा जास्त असतो. नकारात्मक कॅलरीयुक्त पदार्थांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
कॅलरी हा आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि आपण जे काही खातो त्यामध्ये कॅलरीज असतात. कॅलरीज दोन प्रकारच्या असतात. कमी पौष्टिक मूल्य असलेली कॅलरी, ज्यामुळं वजन वाढतं आणि उच्च फायबर आणि पाण्याचं जास्त प्रमाण असलेले पदार्थ. अशा पदार्थांमध्ये कमी कॅलरीज असतात आणि आपल्याला ते पचवण्यासाठी अधिक ऊर्जा लागते. अशा पदार्थांना नकारात्मक कॅलरीयुक्त पदार्थ म्हणतात.
हे पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. कारण, त्यांच्यात कॅलरीज कमी असतातच. पण इतरांपेक्षा जास्त कॅलरीज वापरण्यासदेखील मदत होते. बहुतेक नकारात्मक कॅलरी अन्न वनस्पती आधारित आहेत.
नकारात्मक कॅलरी अन्न
सेलेरी
जांभूळ
टोमॅटो
गाजर
काकडी
टरबूज
सफरचंद
ब्रोकोली
सॅलड पाने
या पदार्थांमध्ये नकारात्मक कॅलरी असतात, ज्यामुळं वजन कमी होऊ शकते. नकारात्मक कॅलरीज असलेले पदार्थ खाल्ल्यानं कोणतेही दुष्परिणाम होतात, याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. तरीही, आहार आणि पोषणतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच कमी प्रमाणात कॅलरीज खाणं योग्य ठरेल.