महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ ऑक्टोबर । पाकिस्तानविरोधातीन सामन्यात सलामीवीरांना उत्तम कामगिरी करता आली नव्हती. परंतु यावेळीही रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (KL Rahul) याच जोडीसह टीम इंडिया मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यात अपयश आलं असलं तरी राहुलचा फॉर्मही उत्तम आहे आणि हिटमॅन एकटाम सामन्याची दिशाही पलटू शकतो, याच्याशी विराट परिचित आहे. सूर्यकुमार यादव यालाही आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनीच उत्तम खेळ खेळला होता.
हार्दिकला मिळणार संधी?
खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या हार्दिक पांड्यावर पुन्हा एकदा टीम इंडिया विश्वास करण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिस सेशनमध्ये हार्दिक पांड्यानं गोलंदाजीही केली आणि न्यूझीलंडविरोधात हार्दिक गोलदाजीही करताना दिसू शकतो. हार्दिक पांड्याला झालेल्या दुखापतीतून तो पूर्णपणे बरा झाल्याची माहितीही कोहलीनं यापूर्वी दिली होती. पाकिस्तान विरोधातील सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर हार्दिकच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
भूवनेश्वरच्या जागी शार्दुल?
भूवनेश्वर कुमारला पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळू शकते. शार्दुलचा सध्याचा फॉर्मही उत्तम आहे आणि त्यानं आयपीएल सामन्यांमध्येही उत्तम कामगिरी केली होती. शार्दुलचा टीममध्ये समावेश झाल्यास टीम इंडियाची फलंदाजीही थोडी मजबूत होऊ शकते. तर दुसरीकडे मोहम्मद शमी, वरूण चक्रवर्ती आणि रविचंद्रन अश्विन यांच्यावर पुन्हा एकदा टीम इंडिया भरवसा दाखवण्याची शक्यता आहे.
असा असू शकतो संभाव्य संघ
केएल राहुल, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती/ रविचंद्रन अश्विन