माथेरानमध्ये दिवाळीनंतर रंगणार मिनीट्रेन उत्सव

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ नोव्हेबर । दिव्यांच्या सणात करोनाचे तिमिर हळूहळू दूर होत असल्याने राज्याच्या पर्यटनाला नवी उभारी आली आहे. पर्यटनाला गती देण्यासाठी माथेरानवासीयांची ‘अर्थवाहिनी’ असलेल्या मिनीट्रेनच्या साथीने ‘माथेरान मिनीट्रेन उत्सव’साजरा करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या पुढाकाराने माथेरान नगरपरिषद आणि राज्य सरकार संयुक्तपणे हा उत्सव साजरा करतील. नेरळ-माथेरानदरम्यान रिकाम्या गाड्यांची चाचणी पूर्ण झाल्याने प्रवासी वाहतुकीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

‘माथेरानवासीयांच्या जीवनात मिनीट्रेनचे महत्त्व आणि मिनीट्रेनमुळे अर्थव्यवस्थेला मिळालेली गती या संकल्पनेवर हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे’. युनेस्को पुरस्कारासाठी माथेरान मिनीट्रेन स्पर्धेत आहे. त्या धर्तीवर या उत्सवाला विशेष महत्त्व आहे.

हा उत्सव १३-१४ नोव्हेंबरला साजरा करण्याचे प्राथमिक नियोजन आहे. राज्य आणि नगरपरिषदेशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले.

मिनीट्रेन उत्सवात स्थानिक खाद्यपदार्थ, वेशभूषा यांना विशेष स्थान असणार आहे. त्याचबरोबर रानमेव्याचीही पर्यटकांना ओळख करून देण्यात येईल. रेल्वे परिसरात हा उत्सव साजरा होणार असल्याने, यासाठी माथेरान नगरपरिषद आणि राज्य सरकारचाही सहभाग असणार आहे.

पर्यटकांची संख्या वाढल्याने मिनीट्रेनचे डबे वाढवण्यात आले आहेत. सध्या अमन लॉज ते माथेरान दरम्यान सहा डब्यांसह मिनीट्रेन धावत आहे. यामुळे पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मिनीट्रेनची दर आठवड्याला देखभाल-दुरुस्ती केली जाते. यासाठी रिकामी गाडी नेरळ येथे आणण्यासाठी आणि देखभालीनंतर गाडी माथेरानला नेण्यासाठी रिकाम्या गाडीची वाहतूक सुरू केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मिनीट्रेन रुळांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. यामुळे प्रवासी सुरक्षेसाठी विविध ठिकाणी भिंत उभारण्याचे नियोजन आहे. तूर्तास प्रवासी वाहतुकीसाठी पर्यटक, तसेच रेल्वे प्रवाशांना आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे, असे शलभ गोयल यांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *