महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ डिसेंबर । टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळेनं (Anil Kumble) पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी हा रेकॉर्ड पुन्हा पाहयला मिळेल असं वाटलं नव्हतं. पण, भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात मुंबईत सुरू असलेल्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड झाला आहे. न्यूझाीलंडचा स्पिनर एजाझ पटेलनं (Ajaz Patel) हा ऐतिहासिक रेकॉर्ड केला आहे.
टीम इंडियाच्या पहिल्या इनिंगमधील सर्व 10 विकेट्स पटेलनं घेतल्या आहेत. पटेलनं पहिल्या दिवशी 4 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर त्यानं दुसऱ्या दिवशीही भेदक बॉलिंग करत उर्वरित सर्व 6 विकेट्स घेत कुंबळेच्या रेकॉर्डची बरोबरी केली. एका इनिंगमध्ये 10 विकेट्स घेणारा तो क्रिकेट विश्वातील तिसरा बॉलर बनला आहे. पटेलनं मोहम्मद सिराजला आऊट करत हा विक्रम केला.
मुंबईमध्ये 21 ऑक्टोबर 1988 रोजी जन्मलेला पटेल वयाच्या आठव्या वर्षांपर्यंत भारतामध्येच होता. पण नंतर कुटुंबासोबत न्यूझीलंडला स्थायीक झाला. सुरुवातीला तो डावखुरा फास्ट बॉलर होता, पण काही काळानंतर त्याने स्पिन बॉलिंग करायला सुरुवात केली.
एजाझ पटेलने 2018 साली टेस्टमध्ये पदार्पण केलं होतं, पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात एजाजने 7 विकेट घेतल्या आणि न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. एजाझ पटेल आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये मॅन ऑफ द मॅच होता. एजाझ पटेलने आतापर्यंत 11 टेस्टमध्ये 30.51 च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहेत. याआधी कानपूरमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्येही एजाझ पटेलने टीम इंडियाच्या हातचा विजयाचा घास हिरावून घेतला. कानपूर टेस्टमध्ये टीम इंडियाला विजयासाठी एका विकेटची गरज होती, पण एजाझ पटेलने रचीन रविंद्रच्या मदतीने अखेरच्या विकेटसाठी 52 बॉल किल्ला लढवला आणि न्यूझीलंडला मॅच ड्रॉ करण्यात यश आलं.