पगार वाढीच्या आनंदावर विरजण पडणार?; इन हँड सॅलरी कमी होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .४ डिसेंबर । कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अनेक कंपन्यांनी पगार वाढ केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पगार वाढल्यानं टेक होम सॅलरी वाढेल, असं तुम्हाला वाटत असल्यास तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. नवीन वेज कोड लागू झाल्यानंतर तुमची टेक होम सॅलरी कमी होऊ शकते. सोबतच तुमच्यावरील कराचा बोजादेखील वाढू शकतो.

कोणत्याही कर्मचाऱ्याच्यी कॉस्ट टू कंपनीचे (सीटीसी) तीन ते चार महत्त्वाचे घटक असतात. बेसिक सॅलरी, हाऊस रेंट अलाऊन्स, पीएफ, ग्रॅच्युटी आणि पेन्शन यासारखे रिटायरमेंट बेनिफिट्स आणि कर वाचवणारे भत्ते म्हणजेच एलटीए आणि एंटरटेनमेंट अलाऊन्स यांचा सीटीसीमध्ये समावेश होतो. नव्या वेज कोडनुसार, एकूण पगारात भत्त्यांचं प्रमाण कोणत्याही स्थितीत ५० टक्क्यांहून अधिक ठेवता येणार नाही.

एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार ५० हजार रुपये असल्यास त्याची बेसिक सॅलरी २५ हजार असायला हवी आणि उरलेल्या २५ हजारांत त्याचे सर्व भत्ते असायला हवेत. सध्याच्या घडीला अनेक कंपन्या बेसिक सॅलरी २५ ते ३० टक्के ठेवतात आणि बाकी रकमेचा समावेश भत्त्यांमध्ये करतात. मात्र आता या कंपन्या बेसिक सॅलरी ५० टक्क्यांपेक्षा कमी ठेऊ शकणार नाहीत. नवे वेज कोड नियम लागू करताना भत्त्यांमध्ये कपातदेखील करावी लागले.

प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी यांचा थेट संबंध बेसिक सॅलरीशी असतो. बेसिक सॅलरी वाढल्यावर प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटीदेखील वाढेल. त्यामुळे कर्मचाऱ्यांची टेक होम सॅलरी कमी होईल. मात्र प्रॉव्हिडंट फंड आणि ग्रॅच्युटी वाढल्यानं निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम वाढेल.

उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार १ लाख रुपये आहे. त्याची बेसिक सॅलरी सध्या ३० हजार आहे. कर्मचारी आणि कंपनी दोघेही पीएफमध्ये १२-१२ टक्के योगदान देतात. दोघांचंही योगदान ३६०० रुपये आहे. तर कर्मचाऱ्याची टेक होम सॅलरी ९२ हजार ८०० रुपये होते. मात्र आता बेसिक सॅलरी ५० हजार होईल. त्यामुळे पीएफचं योगदान वाढले आणि ८८ हजार रुपये हातात पडतील. याचा अर्थ दर महिन्याला ४ हजार ८०० रुपये कमी मिळतील. याच प्रकारे ग्रॅच्युटीच्या रकमेतही वाढ होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *