Omicron: केंद्राने परदेशातून येणाऱ्यांबाबत कडक भूमिका घ्यावी; उपमुख्यमंत्री अजित पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ डिसेंबर । ओमायक्रॉनमुळे उद्भवलेल्या स्थितीवर राज्य सरकार बारीक लक्ष ठेवून आहे; परंतु सध्या वेगवेगळ्या देशातून जे लोक येत आहेत त्यांच्याबाबत केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी. सर्व आंतराष्ट्रीय विमानतळांवर नियमांचे काटेकोर पालन होत आहे की नाही, याकडे लक्ष द्यायला हवे, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.

चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर माध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओमायक्रॉन आणि त्यासंदर्भात उद्भवलेल्या स्थितीवर भाष्य केले. दोन वर्षांपूर्वी एक जोडपे दुबईवरून आले होते. त्यांच्या प्रवासात सोबतच्या वाहनचालकाला कोरोनाची लागण झाली आणि पुढे सर्वत्र हा विषाणू पसरत गेला. आतासुद्धा विविध राज्यात एक-दोन रुग्ण सापडत आहेत. त्यांचे कुटुंब आणि नातेवाइकांना बाधा होत आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्यांबाबत कडक भूमिका केंद्राने घ्यायला हवी आणि विमानतळांवर नियमांचे काटेकोर पालन व्हायला हवे, असे ते म्हणाले. या नवा प्रकार कमी धोकादायक आहे, त्याची तीव्रता कमी आहे वगैरे चर्चा सुरू असली तरी याबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने किंवा जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट सूचना काढणे गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

‘बूस्टर’बाबत चर्चा सुरू
बूस्टर डोस घ्यायला हवा की नको, याबाबतचर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या लस साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याबाबतही देशपातळीवर निर्णय व्हायला हवा. ज्यांनी दोन डोस घेतले त्यांनाही लागण झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकदा देशपातळीवर याबाबत निर्णय झाला की त्याची सर्व राज्ये अंमलबजावणी करतील. बूस्टर डोस घ्यायचा की नाही, घ्यायचा तर का घ्यायचा याची कारणेही समोर यायला हवीत, असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *