महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । कुन्नुरमध्ये घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे घातपात असल्याच्या संशयासह सोशल मीडियात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशा प्रकारच्या चर्चा थांबवण्याचे आवाहन करीत हवाई दलाने शुक्रवारी ट्विट केले. दुर्घटनेची त्रिसदस्यीय चौकशी सुरू केली आहे. तपास वेगाने पूर्ण होऊन दुर्घटनेमागील नेमके सत्य लवकरच समोर येईल. तोपर्यंत अफवा टाळा; शहीदांचा सन्मान राखा, असे हवाई दलाने म्हटले आहे.
8 डिसेंबर रोजी घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हिंदुस्थानचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) जनरल बिपीन रावत व त्यांच्या पत्नीसह 13 जणांचा मृत्यू झाला. अपघात झालेले हेलिकॉप्टर अत्याधुनिक श्रेणीतील होते. उड्डाणापूर्वी सर्व चाचण्या केल्यानंतरही दुर्घटना घडल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही तज्ञांच्या मते, जनरल रावत हे हेलिकॉप्टर दुर्घटनेचे नव्हे, तर कटाचे बळी ठरले आहेत. लष्करातील काही निवृत्त अधिकारी तसेच खुद्द भाजपच्या खासदारांनीही दुर्घटनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच अनुषंगाने हवाई दलाने शुक्रवारी ट्विट करीत कुठलीही ठोस माहिती नसताना अंदाज वर्तवणे थांबवण्याचे आवाहन केले आहे.