महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ डिसेंबर । राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये चार आणि मुंबईत तीन रुग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे. धारावीत ओमायक्रॉनग्रस्त आढळून आल्याने या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. सध्या या भागातील सक्रिय रुग्णांची संख्या सात आहे.
टांझानिया येथून ४ डिसेंबर रोजी मुंबईत आलेल्या धारावीतील रहिवासी कोरोनाबाधित असल्याने त्याचा नमुना जनुकीय विश्लेषणासाठी पाठविण्यात आला होता. या रुग्णाचे लसीकरण झालेले नाही. या रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला सौम्य लक्षणे आहेत. त्याच्या संपर्कातील दोघांची चाचणी करण्यात आली, त्यापैकी कोणीही कोविडबाधित नाही.
लंडन येथून १ डिसेंबर रोजी भारतात आलेल्या २५ वर्षीय तरुणाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. या रुग्णाने लसीचे दोन्हीही डोस घेतले आहेत. त्याला कोणतीही लक्षणे नाहीत. त्याच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींना कोविडची लागण झालेली नाही. गुजरातचा रहिवासी असलेला ३७ वर्षीय रुग्ण दक्षिण आफ्रिका येथून ४ डिसेंबर रोजी मुंबईत आला आहे. त्याने लस घेतली असून खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याला विमानतळावरूनच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला सौम्य लक्षणे आहेत.