महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ डिसेंबर । मराठवाड्यात मागील काही दिवसांत अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन घटत जाणाऱ्या तापमानात वाढ झाली होती. परंतु आता परत सर्वत्र गुलाबी थंडीचा जोर हळूहळू वाढत आहे. तसेच पुढील काळात मराठवाड्यात वातावरण स्वच्छ राहणार असून थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
मराठवाड्यात परत एकदा पहाटेच्या आणि सायंकाळच्या वेळी झोंबणारे गार वारे सुटत आहेत. दिवसभर थंडीचा अनुभव मिळत आहे. परभणी जिल्ह्यातही गुलाबी थंडीचा जोर वाढत आहे. परभणीचा पारा बुधवारी १५ डिसेंबर रोजी १३.६ अंश सेल्सियसवर पोहोचला असल्याची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागात झाली होती, तर १२ डिसेंबर रोजी १३.९ अंश सेल्सियस, १३ रोजी १२.४ अंश सेल्सियस, १४ रोजी १३.८ अंश सेल्सियसची नोंद झाली. दरम्यान, जिल्ह्यात परत एकदा सर्वत्र पहाटे व रात्रीच्या सुमारास थंड गार वारे वाहत आहेत. तापमानात घट होऊन थंडीत होणार वाढ.
मराठवाड्यात पुढील काळात थंडीचा जोर वाढणार असून किमान तापमानात हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तसेच सर्व ठिकाणी स्वच्छ वातावरण राहणार आहे. त्यामुळे थंडीत वाढ होऊन तापमानात घट होईल. रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांसाठी पोषक असे वातावरण असणार आहे. डॉ. के. के. डाखोरे, मुख्य प्रकल्प समन्वयक, ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्र.