Weather: राज्यात पुन्हा घसरला पारा; पुढील 2 दिवस कसं असेल हवामान?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ५ फेब्रुवारी । फेब्रुवारी महिना सुरू होताच राज्यात उन्हाचा चटका वाढताना (Temperature in Maharashtra) दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात राज्यातील काही ठिकाणीचं कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक नोंदलं आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत सोलापूर आणि वाशीम या दोन जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशावर पोहोचला होता. पण आज पहाटे आणि सकाळी अनेक ठिकाणी दाट धुके (dense fog) पडल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. तसेच बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा घसरल्याची (Temperature drop in Maharashtra) नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली आहे.

वायव्य भारतातील पश्चिमी चक्रावाताच्या प्रभावामुळे राजस्थान आणि आसपासच्या परिसरावर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. तसेच बंगालच्या उपसागरावरून पुरवठा होत असलेल्या बाष्पामुळे पूर्व आणि ईशान्य भारतात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (5 फेब्रुवारी) आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशासह पूर्वोत्तर राज्यात तुरळक ठिकाणी गारपिटीसह, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

आज सातारा 11.7, नांदेड 11.6, महाबळेश्वर 11.7, सांगली 13.9, नाशिक 8.8, चिखलठाणा 9, परभणी 11.5, मालेगाव 11, पुणे 10.3, डहाणू 14.6, कोल्हापूर 15.8, रत्नागिरी 17.5, सोलापूर 12.3, ठाणे 18.6, जळगाव 6.7, माथेरान 12.4, हरनाई 18.5 आणि बारामती याठिकाणी 9.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित राज्यात देखील कमी अधिक प्रमाणात हेच तापमान नोंदलं गेलं आहे.

दुसरीकडे, राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान देखील 32 अंशांच्या पुढे गेलं आहे. सांगली, नांदेड, परभणी, अकोला, वर्धा आणि यवतमाळ येथे तर तापमानाचा पारा 33 अंशांच्या वर गेला आहे. रात्री आणि पहाटेच्या तापमानात देखील मोठी तफावत आढळत आहे. पुढील आणखी दोन दिवस राज्यात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *