लता मंगेशकर यांचे पार्थिव प्रभूकुंजवर; मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन, अंत्यविधीला पीएम मोदींची राहणार उपस्थिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ फेब्रुवारी । चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. सचिन तेंडुलकर, आशा पारेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

आज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी 8.12 वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

लताजींचे पार्थिव ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून प्रभूकुंज येथील त्यांच्या घरी नेण्यात आले आहे.

# स्वरकोकिळा यांच्या निधनाची बातमी मिळताच पंतप्रधान मोदींनी गोव्यातील त्यांची व्हर्च्युअल रॅली रद्द केली आहे.
# भाजपने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आहे.
# महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पोहोचून अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
# महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लताजींच्या अंत्यदर्शनासाठी ब्रीच कँडी                            हॉस्पिटलमध्ये  पोहोचले.
# राष्ट्रीय दुखवट्यामुळे मुंबई मंत्रालयावरचा तिरंगा अर्ध्यावर आणला आहे.

संध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.

त्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *