महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२० मार्च । सध्या सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. ग्राहकांना सूर्यफूल तेलाच्या 15 लिटरच्या कॅनसाठी सुमारे 3,000 रुपये मोजावे लागत आहेत.
“सूर्यफूल तेलाची प्रति लिटर किंमत तीन महिन्यांपूर्वी 140-150 रुपयांच्या दरम्यान होती, परंतु सध्या मात्र ती 170-190 च्या दरम्यान आहे,” असे कृषी उत्पन्न पणन समितीचे अधिकारी तसेच गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. (Russia Ukraine war has pushed up the price of sunflower oil)
गेल्या वर्षी ब्रँडेड सूर्यफूल तेलाच्या 15 लिटर कॅनची सर्वोच्च किंमत 2,400 रुपये होती, परंतु सध्या सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) वाईट परिणाम आयातीवर झाला आहे. त्यामुळे मागणी आणि पुरवठा यांचा मेळ न बसल्यामुळे सूर्यफूल तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
रिफाइंड सूर्यफूल तेलाची स्थानिक बाजारपेठेत किंमत 2,650 ते 3,100 रुपये प्रति 15 लिटर आहे. भारत रशिया आणि युक्रेनमधून ७०% सूर्यफूल तेल आयात करतो. दोन्ही देशांमधील तणावामुळे पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आहे. भारतीय उत्पादकांकडून पुरेसा पुरवठा होत नाही. सूर्यफूल तेलाचा पुरवठा थांबल्यामुळे पाम, शेंगदाणे आणि सोयाबीन यांसारख्या विविध प्रकारच्या स्वयंपाकाच्या तेलाच्या मागणीत वाढ झाली आहे, पंरतु गेल्या काही महिन्यांपासून मागणी-पुरवठ्यात फरक दिसून येत आहे, असं गुलटेकडी मार्केट यार्डातील तेल व्यापाऱ्यांनी सांगितले.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बी.व्ही. मेहता म्हणाले, “सोयाबीन आणि मोहरीचे पीक चांगले असल्याने भाव खाली येऊ शकतात आणि स्थानिक तेल उत्पादक येत्या काही दिवसांत चांगल्या प्रमाणात तेलाचा पुरवठा करू शकतात.”