महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । ‘पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी महाराष्ट्रात साथरोगाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे तूर्तास मास्क अनिवार्य करण्यात आलेला नाही. मात्र, शारीरिक व्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे,’ असा आग्रह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी धरला. मुंबई महापालिकेनेही रुग्णवाढ होऊ लागल्याने मास्क वापरावा, असे आवाहन केले.
युरोपातील देश, जपान, चीनमध्ये करोनारुग्ण वाढत असतानाच भारतात राजधानी दिल्ली क्षेत्रासह दिल्ली शहरातही करोनारुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा धास्ती वाढू लागली आहे. या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे यांनी बुधवारी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. ‘महाराष्ट्रात मोठ्या रुग्णवाढीची परिस्थिती नाही. एकेकाळी राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. सध्या १५० ते २०० रुग्ण सापडत आहेत. त्यापैकी ८५ रुग्ण केवळ मुंबईत आहेत. आयसीएमआर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे यावर लक्ष आहे,’ असे टोपे यांनी सांगितले. ‘लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. तर दुसरीकडे बूस्टर मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना आपली रोग प्रतिकारशक्ती कमी वाटत आहे, अशांनी खासगी रुग्णालयात बूस्टर मात्रा द्यावी,’ असेही टोपे म्हणाले.
केंद्र सरकारने एकूण आठ राज्यांना पत्र दिले आहे. मास्क अनिवार्य करण्याची सूचना त्यात आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या स्थितीनुसार मास्कबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे.
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री