महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२५ एप्रिल । पूर्णवेळ वीज न देता सर्वसामान्य ग्राहकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल करण्यासाठी बिले काढणाऱ्या या सरकारने नागरिकांना भारनियमनात चटके देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याविरोधात शनिवारपासून राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी शुक्रवारी दिला. विजेची कृत्रिम टंचाई निर्माण करून टक्केवारी मिळविण्याचा प्रकार साधण्यासाठी राज्यात सध्या भारनियमन केले जात असल्याचे टीकास्त्र त्यांनी महाविकास आघाडीवर सोडले.
राज्यात गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या अघोषित भारनियमन अखेर ऊर्जामंत्र्यांनी अधिकृत म्हणून जाहीर केले आहे. सर्वसामान्यांचे वीज बिल थकल्यानंतर त्यांच्यावर तातडीने कारवाई करणाऱ्या सरकारच्या अनेक खात्यांकडे वीज बिलांची मोठी थकबाकी आहे. त्यामुळे सरकारने त्यांची वीज कधी तोडणार याची माहिती नागरिकांना द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. आधीच पुरेशी वीज मिळत नसताना, सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून त्याच्या वसुलीसाठी ग्राहकांवर बोजा लादणे सुरू केले आहे. महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यानेच महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांमध्ये बेशिस्ती वाढली असून नियोजनशून्यतेचा मोठा फटका राज्यातील नागरिकांना सहन करावा लागतो आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी सरकारने राज्याला जाणीवपूर्वक अंधारात ढकलण्याचे पाप केले, त्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात म्हटले.