महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ जुलै । शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता मंत्रिमंडळात कोण मंत्री असणार यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. प्रहारचे बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. यावर आता बच्चू कडू यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
‘काही वृत्तवाहिन्यांनी माझ्याबद्दल जे मंत्रिपद आणि खाते वाटपच्या अनुषंगाने जी बातमी दाखवली आहे ती चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मी या संदर्भात कुठल्याही वृत्तवाहिनीवर प्रतिक्रिया दिली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही कुणी याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन बच्चू कडू यांनी केले.