महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० जुलै । 50 आमदारांनी विश्वास दाखवणं ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील 33 देशांनी कौतुक केले आहे. मी कमी बोलतो आणि जास्त एकतो. सभागृहात देखील मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सगळं सांगेन अशा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
पंढरपुरातील मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या मेळाव्याला शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदरांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.
एकनाथ शिंदे म्हणाले, “हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. आज केवळ आंनद दिघे यांच्या आशीर्वादाने इथे उभा आहे. धर्मवीरमध्ये सगळा प्रसंग दाखवता आला नाही. गेल्या वीस ते 22 वर्ष झाले माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. पण मी डगमगलो नाही. आताही डगमगणार नाही. मी जास्त बोलत नाही, शिवाय टिकाकारांना कामातून उत्तर देईन.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना मिश्किल टिप्पणी देखील केली. त्यांना मेळाव्याला येण्यासाठी थोडासा वेळा झाला. त्यावरून त्यांनी विनोदी टिप्पणी केली. यायला उशीर झाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. ऑपरेशन मोडमध्ये गेल्या नंतर असाच उशीर होतोय, अशी टिप्पणी एकनाथ शिंदे यांनी केली. शिंदे यांच्या या टिप्पणीने उपस्थितांमध्ये एकच हाशा पिकला.
“हे ऑपरेशन सुरू झाल्यापासून झोपच नाही. पाहिले दोन-तीन दिवस तर एक मिनीट देखील झोपलो नाही. झोप कशी लागणार. 50 आमदारांची जबाबदारी आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जावू देणार नाही, अशा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.