महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० जुलै । कोरोना काळापासून कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना घरून काम करणे काय असते हे समजले आहे. आताही अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होम कल्चरच सुरु ठेवत आहेत. अनेकांना ऑफिसला जाण्याचा देखील कंटाळा येत आहे. असे असताना वर्क फ्रॉम होमवरून केंद्र सरकारने नियम लागू करण्याची तयारी सुरु केली आहे.
या नव्या नियमानुसार कर्मचारी अधिकाधिक वर्षभरच घरातून काम करू शकतो. हा नियम अधिकाधिक ५० टक्के कर्मचाऱ्यांवरच लागू करता येणार आहे. वाणिज्य मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी करून नवीन नियमांची माहिती दिली आहे.
घरातून काम करण्याचे हे नियम विशेष आर्थिक क्षेत्र किंवा विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) युनिट्ससाठी आहेत. या भागात असलेल्या कंपन्या आता त्यांच्या कर्मचाऱ्यांना नवीन नियमांनुसार घरून काम करण्याची परवानगी देऊ शकतात. बिझनेस टुडेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
मंत्रालयाने सांगितले की, उद्योग विश्व अनेक दिवसांपासून याची मागणी करत होते आणि त्या आधारावर ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उद्योग जगताने समान वर्क फ्रॉम होम नीति लागू करण्याची मागणी केली होती. वर्क फ्रॉम होमचा नियम हा २००६ मध्येच बनला होता, त्यामध्ये नवा नियम 43ए अधिसूचित करण्यात आला आहे.
या नव्या नियमांचा फायदा आयटीमधील कर्मचाऱ्यांना अधिक होणार आहे. यासाठी कंपन्यांना त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांचा आकडा जाहीर करावा लागणार आहे. तसेच एसईझेडच्या विकास आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.