पर्यटकांसाठी खुशखबर ; ‘या’ जिल्ह्यातील गड, किल्ले, पर्यटनस्थळे खुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील गड, किल्ले; तसेच पर्यटनस्थळांवर जमावबंदीचे दिलेले आदेश आता मागे घेण्यात आले आहेत. घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरल्याने हे आदेश मागे घेतल्याने आता पर्यटकांना गड, किल्ल्यांवर पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

जिल्ह्यात घाटमाथ्यावर पाच जुलैपासून जोरदार पाऊस होत होता. याबाबत हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशाराही दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोणतीही दुर्घटना होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. त्यासाठी जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, गड-किल्ल्यांच्या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात कोणतीही वाहने जाण्यास किंवा पाच किंवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींना जाण्यास मनाई केली होती. आता हे आदेश मागे घेण्यात आल्याच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे यांनी दुजोरा दिला.

‘पावसामुळे अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने १४ ते १७ जुलै या कालावधीसाठी जमावबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे गड, किल्ल्यांवर पर्यटन करण्यास मनाई होती. आता जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे जमावबंदीचे आदेश सध्या लागू नाहीत. पुन्हा मुसळधार पाऊस परतल्यास किंवा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आल्यास योग्य ते आदेश प्रशासनाकडून काढले जातील. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यातील गड-किल्ले, पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, पर्यटकांनी निसर्गरम्यस्थळी गेल्यानंतर स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,’ अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.

नदीकाठची गावे, धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील ठिकाणे, गड-किल्ले, पर्यटनस्थळे, डोंगरांतून कोसळणारे धबधबे अशा ठिकाणी पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे रस्ते अरुंद असल्याने वाहने रस्त्यावर लावू नयेत. रस्त्यावर चिखल होणे, दरड कोसळणे, रस्ता निसरडा होणे यांसारखे प्रकार होण्याची शक्यता असते. त्या दृष्टीने वाहने चालवावीत. जे वाहनचालक या सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

– विठ्ठल बनोटे,

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *