महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ जुलै । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोकणातील पक्षाचे मातब्बर नेते रामदास कदम यांची नेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव यांच्यावर जोरदार पलटवार केला. शिवसेना वाचवायची असेल तर तुम्ही राष्ट्रवादीचा नाद सोडा, असं कदम यांनी म्हटलं. तसंच शिवसेनेतील ४० आमदार वेगळा विचार करत असतील तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करायला हवं, असंही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता गुहागर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना आक्रमक इशारा दिला आहे.
‘मला रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्यावर एकदा बोलायचे आहे. मी आज सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवून आहे. कोण-कोण या बाबतीत मत मांडत आहे, ते मी पाहतोय. पण रामदास कदमांना मला एकदा रोखठोक उत्तर द्यावं लागेल आणि ते मी योग्यवेळी देईन,’ असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.