विकासकामांसाठी केंद्राकडे 18 हजार कोटींचे प्रस्ताव :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । राज्य सरकारने केंद्राकडे विविध विकासकामांसाठी 18 हजार कोटींचे प्रस्ताव पाठवले आहेत. राज्यात आता सामान्यांचे भाजप, शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण निधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे निती आयोगाचा बैठक पार पडली. सर्व राज्याचे मुख्यमंत्री बैठकीस हजर होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारतर्फे केंद्राकडे करण्यात आलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात तलावांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार, शहर सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत. नवी मुंबईत शेकडो एकरवर नैना प्रकल्प उभारला जात आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाच्या आजुबाजूच्या परिसरातही औद्योगिक केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व कामांसाठी खरे तर 28 हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात केंद्राकडे 18 हजार कोटींचा प्रस्ताव दिला आहे. हा सर्व निधी मिळेल अशी आशा आणि अपेक्षा आहे.

जीएसटी परतावा वेळेवर मिळेल

थकीत जीएसटी परताव्यावरुन महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारमध्ये चांगलेच खटके उडायचे. केंद्राकडून वेळेत परतावा मिळत नसल्याने मविआच्या नेत्यांकडून केंद्रावर वारंवार टीका केली जात होती. मात्र, आता केंद्राकडून जीएसटी परतावा वेळेवर मिळेल का, यावर शिंदे म्हणाले, आता सर्व थकित जीएसटी परतावा वेळेवर मिळेल. राज्यात आता सर्वासामान्यांच्या हिताचे सरकार आले आहे. केंद्रासोबत आमचा चांगला ताळमेळ असून केकंद्र राज्याला पूर्ण सहकार्य करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *