महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ऑगस्ट । आशिया कपचा उत्साह एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. त्याच वेळी क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. जवळपास ११५ आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूनं अचानक संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे क्रीडा विश्वात मोठा धक्का बसला आहे. 36 व्या वर्षी अष्टपैलू खेळाडूनं तडकाफडकी निर्णय घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
36 व्या वर्षी अचानक संन्यास घेण्याच्या निर्णयामुळे न्यूझीलंड क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचा 36 वर्षीय अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रँडहोम (Colin de Grandhomme) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.न्यूझीलंड क्रिकेटशी चर्चा केल्यानंतर त्याने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. बोर्डाने ग्रँडहोमला त्याच्या करारातून मुक्त केलं आहे.
संन्यास घेण्याबाबत घोषणा करताना किवी खेळाडू म्हणाला, ‘मी हे मान्य करतो की मी आता तरुण राहिलो नाही. माझ्यासाठी हे प्रशिक्षण दिवसेंदिवस कठीण होत आहे. विशेषतः दुखापतींमुळे गोष्टी खूप कठीण होत आहेत.त्यामुळे आता क्रिकेटनंतर माझे भविष्य कसे असेल हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे.’
ग्रँडहोम क्रिकेटच्या करिअरपेक्षा आपल्या दुखापतीमुळे जास्त चर्चेत आला आहे. त्याने जूनमध्ये न्यूझीलंडसाठी शेवटचा सामना खेळला. ग्रँडहोमने त्याच्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत न्यूझीलंडकडून 115 सामने खेळले. त्याने 118 डावात 2679 धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन शतकं तर 15 अर्धशतके आहेत. फलंदाजीसोबतच तो किवी संघासाठी गोलंदाजीतही हिट ठरला. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 91 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.