महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ सप्टेंबर । झारखंडमध्ये निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री हेमंत सोरेन आज पदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हेमंत सोरेन विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज संध्याकाळी 4 वाजता त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर ते राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोरेन पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. त्यासाठी झारखंड मुक्ती मोर्च्याच्या नेत्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितला होता. मात्र, राज्यपालांनी त्यांना वेळ देण्यास नकार दिला आहे.
हेमंत सोरेन यांच्याविरोधात लाभाच्या पदप्रकरणी निवडणूक आयोगाने राज्यपालांना शिफारस पाठवत सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची सूचना केली होती. मात्र, राज्यपाल रमेश बैस यांनी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या शिफारसीमुळे पद जाण्याचा धोका आणि भाजपकडून घोडेबाजार होण्याची शक्यता लक्षात घेत सोरेन आज राजीनामा देत पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पुन्हा सत्तास्थापनेसाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
या घटनेमुळे झारखंडमधील राजकीय हालाचालींना वेग आला आहे. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना छत्तीसगडच्या रायपूरच्या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर भाजपकडून आमदारांना आमिषे दाखवण्यात येत आहे. तसेच भाजपकडून घोडेबाजार होत असल्याचा आरोप सोरेन यांनी केला आहे.
हेमंत सोरेन यांनी स्वतःसाठी खाणपट्टा घेत निवडणूक कायद्याचा भंग केल्याचा आरोप भाजपने राज्यपालांकडे केला होता. लाभाचे पद प्रकरणी सोरेन यांची विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजपने केली होती. याबाबत राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस मागितली होती. संविधानानुसार कोणत्याही सदस्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय राज्यपालांना घ्यायचा असतो. तसेच त्यांना अंतिम निर्णय घेण्यापूर्वी राज्यपालांना निवडणूक आयोगाचा सल्ला घ्यावा लागतो आणि त्यानुसारच निर्णय घ्यावा लागतो.