संजय राऊतांच्या अडचणीत वाढ ; ईडीकडून आरोपपत्र दाखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ सप्टेंबर । कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात जवळपास दीड महिन्यापासून कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तपासाअंती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्याचवेळी राऊत यांनी केलेल्या जामीन अर्जालाही ईडीने शुक्रवारी प्रतिज्ञापत्राद्वारे तीव्र विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर, राऊत यांच्या जामीन अर्जावर आता पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या कथित मनी लाँड्रिंग गुन्ह्याच्या प्रकरणात ईडीने राऊत यांना ३१ जुलैच्या मध्यरात्री अटक केली. त्यांनी मागील आठवड्यात अॅड. विक्रांत साबणे यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला. त्याला ईडीचे सहाय्यक संचालक डी. सी. नाहक यांनी शुक्रवारी प्रतिज्ञापत्र दाखल तीव्र विरोध दर्शवला.

 

‘संजय राऊत यांचा निकटवर्तीय प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे राकेशकुमार वाधवान व सारंग वाधवान यांनी संगनमत करून गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात एक हजार ३९ कोटी ७९ लाख रुपयांचा घोटाळा केला. या घोटाळ्याशी संजय राऊत यांचाही घनिष्ठ संबंध आहे. यातून बचाव व्हावा या उद्देशानेच त्यांनी पडद्यामागे राहून काम केले. घोटाळ्यातून आलेल्या पैशांपैकी तीन कोटी २७ लाख ८५ हजार ४७५ रुपयांचा वापर करत संजय राऊत यांनी मालमत्ता खरेदी केल्या आणि परदेशांत प्रवासही केला. त्यामुळे घोटाळ्याशी संबंध नसल्याच्या त्यांच्या दाव्यात काहीच तथ्य नाही’, असे म्हणणे ईडीने न्यायालयात मांडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *