महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ सप्टेंबर । दापोलीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्यावर जोरदार टीका केली. यावेळी आदित्य ठाकरे, खा.विनायक राऊत,आ.अनिल परब,आ.राजन साळवी,माजी आमदार सूर्यकांत दळवी आदी उपस्थित होते.
रामदास कदम शेळपटा सारखी उत्तरे देऊ नका,हिंम्मत असेल तर पोरग्याला आमदारकीचा राजीनामा द्यायला सांगा. हिम्मत असेल तर निवडून येऊन दाखवा, असे थेट आव्हान भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना दिले.
मी राष्ट्रवादीत पालकमंत्री असताना माझे पाय धरलेत आणि मी राष्ट्रवादीत येतोय मला विरोध करू नको, असे सांगितलेत. आता शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्याचे आवडले नाही, असे रामदास कदम सांगत आहेत.राष्ट्रवादीला शिव्या देऊन आणि उद्धव ठाकरे यांना शिव्या देऊन बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांना लक्ष्य केले.
तुम्ही सांगता आम्ही खरे शिवसैनिक. पण परवा पैठण येथील मुख्यमंत्र्यांच्या सभेत भाजपचे केंद्रीय मंत्री उपस्थित होते. याचा अर्थ तुम्हाला भाजपचे शेपुट धरुन जावे लागतेय. शिवसेनेला कोणाचही शेपुट धरुन जावे लागत नाही. ज्या उदय सामंतांनी तुमच्या लेकाची वाट लावली आणि आता त्यांच्यासोबतच राहताय. २०१४ साली सूर्यकांत दळवी,अनंत गीते यांना पाडण्याच काम तुम्ही केलेत. तुम्ही पक्षविरोधी कारवाई केली होती, असे भास्कर जाधव यांनी म्हटले. शपथा घेता पण एकेकाळी किशोर कानडे शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवत होते, तेव्हा तुम्ही केशवराव भोसले यांचे ड्रायव्हर म्हणून शिवसेनेविरोधात प्रचार करत होतात. ते साल होते १९८५ आणि तुम्ही निष्ठा सांगता १९७० च्या, पण १९८५ साली तुम्हाला शिवसेनाप्रमुखांनी पक्षातून काढून टाकले होते, असा दावाही भास्कर जाधव यांनी केला.