महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पिंपरी- चिंचवड – पुणे (2 मे 2020) : अँटी कोरोना टास्क फोर्सच्या महाराष्ट्र राज्य आणि गोवा प्रमुख भारती चव्हाण यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अँटी कोरोना टास्क फोर्सच्या (एसीटीएफ) राष्ट्रीय महिला अध्यक्षापदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीचे पत्र एसीटीएफचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र चौधरी, राष्ट्रीय समन्वयक क्रिशन कुमार यांनी 1 मे रोजी ऑनलाईन दिले आहे.
भारती चव्हाण यांची एसीटीएफच्या महाराष्ट्र आणि गोवा राज्य प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर चव्हाण यांनी अल्पावधीतच राज्यातील सर्व जिल्हे, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर हजारो स्वयंसेवकांचे संघटन उभारले आहे. याव्दारे आतापर्यंत दहा हजाराहून जास्त कुटुंबांना प्रत्यक्ष अन्नधान्याचे किट, मास्क, सॅनिटायझर, साबणचे वाटप तसेच रोज तीन हजाराहून जास्त कुटुंबांना जेवणाची सुविधा देण्यात येत आहे. लॉक डाऊनमुळे अनेक व्यक्ती व कुटुंबांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना मानसिक, शारिरीक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी राज्यस्तरावर तज्ज्ञ डॉक्टरांचा समुपदेशन सेल स्थापन करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून नागरिकांना व्हिडिओव्दारे सकारात्मक मार्गदर्शन करण्यात येत आहे. भारती चव्हाण या निरपेक्ष भावनेने हे सर्व कार्य करीत असल्याचे पाहून त्यांच्या बरोबर तज्ज्ञ, सल्लागार व समन्वयक स्वत:हून मदतीसाठी पुढे आले आहेत. यामध्ये माजी कुलगुरु, शास्त्रज्ञ, संशोधक, डॉक्टर, परिचारिका, वकील, सेलिब्रेटी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, निवृत्ती पोलिस अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक वर्ग, शिक्षक, महाविद्यालयीन विद्यार्थी, शेकडो महिला बचतगटाच्या भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, ज्येष्ठ साहित्यिक, आयटी इंजिनियर्स, समुपदेशक, योग प्रशिक्षक, निसर्गोपचार तज्ज्ञ, अक्यूप्रेशर तज्ज्ञ, आणि हजारो समाज सेवक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहेत.
एसीटीएफच्या या समन्वयक व स्वयंसेवकांच्या माध्यमातून मागील काळात झालेल्या कार्याची दखल घेऊन भारती चव्हाण यांना राष्ट्रीय स्तरावर महिला अध्यक्षा म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या या कार्यात महिला भगिनींचा उल्लेखनीय सहभाग आहे. या नियुक्तीनंतर भारती चव्हाण यांना जम्मू काश्मिर, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, झारखंड, पंजाब, गोवा, बिहार, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यातील अनेक मजूर ठिकठिकाणी लॉकडाऊनमुळे अडकून पडले आहेत. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मजूर व त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत. अशा अडकून पडलेल्या मजूरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एसीटीएफच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर एक खिडकी योजनेसारखे अँप बनविण्यात आले आहे. या अँप माध्यमातून शासकीय अधिका-यांशी समन्वय साधून गरजू नागरिकांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत व मार्गदर्शन करण्यात येत आहे