पुणेकरांना दिलासा देणारी बातमी; कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्यांची संख्या वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – पुणे – पुणेकरांना गेल्या दीड-पावणेदोन महिन्यांपासून हैराण केलेल्याने कोरोनाने आता दिलासाही देण्यास सुरवात केली आहे. सलग 14 दिवसांच्या उपचारानंतर आणखी 53 रुग्ण शनिवारी (ता.2) बरे झाले असून, गेल्या दोन दिवसांत शंभरहून अधिकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.परिणामी, आतापर्यंत पावणेचारशे रुग्ण ठणठणीत झाले आहे. मात्र, पुण्यात 107 नवे रुग्ण सापडले आहेत; तर चार जणांचा मृत्युही झाला आहे. विशेष म्हणजे, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नाशीच्या पुढे जात असल्याने दिलासा मिळाला आहे.

कोरोना लागण झालेले आणि रुग्णालयांत उपचार घेत असलेले 67 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. शहरातील एकूण 1 हजार 718 रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. मात्र, त्यातील 78 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्याशिवाय 96 जणांचा मृत्यू झाल्याने आजघडीला 1 हजार 246 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातही बरे होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

शहरातील सुमारे 10 हजार 302 जणांच्या घशातील द्रव पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी केली असता; त्यापैकी 8 हजार 650 लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. विविध रुग्णालयांत उपचार घेतलेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. ते 40 आणि 60 पेक्षा अधिक वयाचे असून, त्यांना अन्य आजारही असल्याचे तपासण्यांमधून स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *