संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात वावगं नाही- शरद पवार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ जानेवारी । संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जाणीवपूर्वक विविध वाद उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

बारामती येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, अजित पवारांचे संभाजी महाराजांविषयी विधान मी पाहिले; पण संभाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख आणि सावरकरांनी लिहिलेले लिखाण कोणालाही पसंत पडणारे नाही; पण ते कधीकाळी लिहिलेले होते. ते आता उकरून काढून राज्यातील वातावरण खराब करण्यात उपयोग नाही. मात्र, संभाजीराजेंना धर्मवीर म्हणण्यात काहीही वावगं नाही.

काही नागरिक, व्यक्ती, घटक संभाजीराजेंविषयी बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण करतात, तर काही घटक संभाजीराजे यांच्याकडे धर्मवीर म्हणून पाहत असतील, तर त्याविषयी तक्रार करण्याचे कारण नाही, असेही पवार म्हणाले.

महाराष्ट्रात भाजपच्या वतीने ४५ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याची घोषणा भाजप नेत्यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी मिशन ४५ ऐवजी मिशन ४८ करायला पाहिजे, असा टोला पवार यांनी लगावला.

विरोधी पक्षनेते अजित पवार गेल्या काही दिवसांपासून माध्यमांच्या संपर्कात नसल्याचे पत्रकारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निदर्शनास आणले. त्यावर माझी व त्यांची भेट नाही. ते माध्यमांशी बोलतील, असे पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *