महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – कोरोना संकटाच्या काळात वैद्यकीय सेवा सुरु ठेवणाऱ्या खाजगी डॉक्टरांना पीपीई किट्सचे संरक्षण मिळणार आहे. मात्र शहरातील कंटेन्टमेंट झोनजवळच्या आणि आतमधील खाजगी दवाखाने सुरु ठेवणाऱ्या डॉक्टर्स यांनाच ही सुविधा मिळणार आहे. याशिवाय रुग्णवाहीका चालक आणि क्लिनर यांनाही पीपीई किट्स उपलब्ध करुन देण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
कोरोनाच्या संकटाच्या काळात अनेक डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा सुरु ठेवल्या आहेत. मात्र संरक्षण किट्स नसल्यामुळे अनेक ड़ॉक्टरांनी संसर्ग होण्याच्या धाकाने दवाखाने, रुग्णालये बंद ठेवले होते. पालिकेने पीपीई किट्स उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी खाजगी डॉक्टरांकडून होत होती. या संदर्भात मुंबई महापालिका प्रशासनाने एक आदेश जारी केला आहे.
या आदेशानूसार डॉक्टरांसोबत, रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हर आणि क्लिनर्स यांनाही पीपीई किट्स मिळणार आहेत. या निर्णयामुळे कोरोना रुग्णांसाठी अधिक रुग्णवाहीका उपलब्ध होण्यात मदत मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पुढे आल्या आहेत. रुग्णवाहिका मिळण्यास उशीर लागल्याने काही रुग्णांचा मृत्यु झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याशिवाय पालिकेनं कोविड रुग्णांसाठी बेस्टच्या 72 मिनी बसेसचे रुपांतर तात्पुरत्या रुग्णवाहिकेत करण्यात येणार आहे.
सर्व 24 वार्ड अधिकाऱ्याना अंधेरी स्पोर्ट कॉम्पेक्समधून पीपीई किट्स उचलण्याचे निर्देश पालीका प्रशासनाने दिले आहेत. गरजेनूसार अधिक पीपीई किट्ससाठी मागणी नोंदवा, प्रत्येक आठवड्याला आवश्यकतेनुसार हे किट्स वाटण्यात येईल असही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.