महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ फेब्रुवारी । ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने संघाच्या फिरकी माऱ्याबद्दल त्याला चिंता वाटत नसून भारताविऊद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत अनुभवी ऑफस्पीनर नॅथन लायनला मदत करण्यासाठी पुरेसे पर्याय उपलब्ध आहेत, याकडे लक्ष वेधले आहे. गुऊवारपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने मिशेल स्वीपसन आणि अॅश्टन आगर या फिरकी गोलंदाजांना लियॉनसोबत संघात स्थान दिले आहे.
मिशेल स्टार्सी परत आल्यानंतर भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत, असे कमिन्सने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. आम्ही निश्चितपणे असे गोलंदाज निवडू की, जे आम्हाला 20 बळी घेतील असे वाटते. परंतु आम्ही त्यांना कसे वाटून घालू याविषयी आमचे अद्याप 100 टक्के ठरलेले नाही, असे त्याने स्पष्ट केले. दोन्ही बाजूंनी फिरकी मारा करणे पसंत केले जाईल का असे विचारले असता तो म्हणाला की, अर्थात ते परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे. एकदा आम्ही नागपूरला पोहोचलो की, आम्ही त्यावर विचार करू, असे त्याने सांगितले.
ऑस्ट्रेलियन संघ सोमवारी नागपूरला रवाना होणार असून त्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडू सराव शिबिरासाठी येथे आले आहेत. चांगली गोष्ट म्हणजे आगरसारखा गोलंदाज आमच्या मागील दौऱ्यावरील संघात समाविष्ट होता, तर स्वीपसन शेवटच्या दोन परदेश दौऱ्यांत खेळलेला आहे. त्यामुळे त्याला थोडा अनुभव आहे. मर्फी मागील दौऱ्यात खेळला होता. त्यामुळे लायनला आधार देण्याच्या दृष्टीने फिरकी गोलंदाजीच्या विभागात आमच्याकडे खूप पर्याय आहेत, असे कमिन्सने सांगितले.
29 वषीय कमिन्सने यावेळी निदर्शनास आणले की, मधल्या फळीतील फलंदाज ट्रॅव्हिस हेड हाही ऑफ-स्पिन टाकतो. ट्रॅव्हिस हेड हा खरोखरच उत्तम ऑफस्पिन गोलंदाजी करतो. आम्हाला समतोल साधावा लागेल. आमच्याकडे निवडण्यासाठी भरपूर विविधता आहे, असे तो म्हणाला. मात्र फिरकी गोलंदाजीबद्दल खूप चर्चा होत असताना संघाने त्यांच्या भेदक वेगवान गोलंदाजीला विसरून चालणार नाही, असे मत कमिन्सने व्यक्त केले. काही वेळा फिरकीपटूंबद्दल बोलताना आमचे अनेक वेगवान गोलंदाज सर्व परिस्थितीत किती चांगली कामगिरी करू शकतात हे विसरले जाते, असेही तो म्हणाला.