महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । जर पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या जगातील कोणतीही श्रीमंत व्यक्ती आमदार, खासदार फोडून पंतप्रधान होऊ शकते. त्या पक्षाला काही अर्थ नाही, त्याला गद्दार म्हणतात अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Uddhav Thackeray) यांनी संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर (Matoshree) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टातील (Supreme Court) अपात्रतेचा (Disqualification) निर्णय आधी झाला पाहिजे अशी मागणी केली आहे.
“गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून शिवसेनेचं काय होणार? धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही?तसंच गद्दारी करुन टेंभा मिरवणार अशी चर्चा सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाकडे दोन्ही प्रकरणं प्रलंबित आहेत. निवडणूक आयोगाची सुनावणी पूर्ण झाली आहे. दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. शेवटी निवडणूक आयोगाने गेल्या 30 तारखेला दोन्ही बाजूंना आपलं म्हणणं लिखित स्वरुपात मांडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. मी दुसरी शिवसेना (Eknath Shinde Faction) मानत नाही. शिवसेना एकच असेल आणि एकच राहणार असंही यावेळी ते म्हणाले.
“सोबत असणारे हजारो शिवसैनिक, जनता यांना काय होणार याची उत्सुकता आहे. जर पक्ष केवळ निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर जगातील कोणतीही श्रीमंत व्यक्ती आमदार (MLA), खासदार (MP) फोडून पंतप्रधान होऊ शकते. त्या पक्षाला काही अर्थ नाही. त्याला गद्दार म्हणतात,” असा संताप उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.