…आणि राज ठाकरेंनी बाळासाहेबांबद्दल सांगितला ‘तो’ किस्सा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १९ फेब्रुवारी । ‘माझं नाव स्वरराज आहे, यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. माझे वडील संगीतकार होते,माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी संगीत क्षेत्रात काही तरी करावं, त्यामुळे त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. पण नंतर बाळासाहेबांनी माझं नाव राज ठाकरे असं केलं’ असा किस्सा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितला.

मुंबईतील VJTI कॉलेजच्या रंगवर्धन या सांस्कृतिक कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी विद्यार्थीशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या नावाबद्दल खास खुलासा केला.

‘माझं नाव स्वरराज आहे, यात लपवून ठेवण्यासारखं काही नाही. माझे वडील संगीतकार होते, मोहम्मद रफी यांनी माझ्या वडिलांकडे 14 गाणी गायली. माझ्या वडिलांची इच्छा होती की, मी संगीत क्षेत्रात काही तरी करावं, त्यामुळे त्यांनी माझं नाव स्वरराज ठेवलं. माझ्या आईचं नाव लग्नामध्ये मधुवंती ठेवलं. मधुवंती हा राग आहे, माझ्या बहिणीचं नाव जयजयवंती ठेवलं. पण कालांतराने त्यांना माझा राग कळला. याला राग कुठे येतो, कुठे येत नाही हे त्यांना कळलं. मी जेव्हा व्यंगचित्र काढत होतो, त्यावेळी स्वरराज या नावाने काढत होतो. आणि एकेदिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलावलं, मी राजकारणाची सुरुवात बाळ ठाकरे नावाने केली, आजपासून तू राज ठाकरे या नावाने केली, तेव्हापासून मी राज ठाकरे झालो’ असं राज ठाकरेंनी सांगितलं.

‘मी भाषणासाठी उभे राहतो तेव्हा माझे हात पाय थंड असतात. मला माहीत नसतं मी काय बोलणार आहे. मी ठरवून काही भाषण करत नाही, त्याला फारसं फालो नका करू. मी पहिल्यांदा भाषण केले होते तेव्हा मीनाताई आल्या. तेव्हा त्या बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेल्या. बाळासाहेबांसमोर गेलो १९९१ सालची गोष्ट आहे फोन वरून बाळासाहेब भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितलं, जे मैदान असेल त्या मैदानाची भाषा बोल, कसं बोलो हे महत्त्वाचं नाही, आपण त्यांना काय विचार दिला, याचा विचार कर. आपण किती शहाणे आहोत, हे नको सांगू, लोक कसे शहाणे होतील ते सांग, या दोन तीन गोष्टी मला सांगितल्या, तेव्हा माझा विचार हा असाच असतो असा किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.

‘परवा मी एक गोष्ट शोधली, ऐकून नवीन वाटेल. बायको हा आपला शब्द नाही, बायको हा शब्द तुर्की आहे. मला बायको असून माहीत नव्हती, असं राज ठाकरे म्हणताच एकच हश्शा पिकली.

‘मी शिववेडा आहे. औरंगजेबला शिवाजी महाराज हा विचार मारायचा होता. पण तो ते करू शकला नाही. आपण शिवाजी महाराज यांचे वारसदार आहोत हे विसरू नका आणि कोणाचे मिंदे होऊ नका. कधीही जाती पातीच्या भानगडीत पडू नका. जातीची मत हवीत त्यांचे कल्याण करू नका, सगळा विचका झाला आहे. महाराष्ट्र जाती पातीच्या विळख्यात अडकू नका , जात बघून मैत्री करू नका, असा सल्लाही राज ठाकरेंनी विद्यार्थ्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *