अमृतपालभोवती पाश आणखीनच आवळला! ३४ समर्थकांना अटक

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० मार्च । पंजाब पोलिसांनी कट्टरपंथी धर्मोपदेशक आणि खलिस्तानसमर्थक अमृतपालसिंग भोवतीचा पाश रविवारी आणखी आवळला. पोलिसांनी रविवारी अनेक भागांत फ्लॅग मार्च करीत अमृतपालला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी अमृतपालच्या आणखी ३४ समर्थकांना अटक केली असून त्याच्या चार निकटवर्तीयांना आसाममधील तुरुंगात पाठवले आहे.

दरम्यान, पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने ‘हेबियस कॉर्पस’ याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारकडून मंगळवारपर्यंत उत्तर मागितले आहे. अमृतपालला पोलिसांनी यापूर्वीच बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असून, त्यांना सोडण्यात यावे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

अमृतपालचा शोध सुरूच

कट्टरपंथी प्रचारक आणि खलिस्तानसमर्थक अमृतपालसिंगचा शोध पोलिसांकडून रविवारीही सुरूच होता. अमृतपालच्या ‘वारिस पंजाब दे’ संघटनेच्या पंजाबमध्ये अटक केलेल्या चार सदस्यांना रविवारी आसाममधील दिब्रुगडला नेण्यात आले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर, पंजाब सरकारने राज्यातील इंटरनेट आणि एसएमएस सेवेवरील बंदी सोमवारी दुपारपर्यंत वाढवली. अमृतपाल आणि त्याच्या साथीदारांविरोधात बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी नव्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमृतपालच्या चार साथीदारांना पंजाबमध्ये अटक करण्यात आली होती. या चौघांना विशेष विमानाने आसामला नेण्यात आले. तेथील दिब्रुगड मध्यवर्ती कारागृहात या चौघांना ठेवण्यात आले आहे,’ असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या घडामोडींचा अधिक तपशील त्यांनी जाहीर केला नाही.

पंजाब सरकारने अमृतपालसिंगच्या विरोधात शनिवारी मोठी कारवाई सुरू केली. त्याच्या संघटनेच्या ७८ सदस्यांना शनिवारी अटक करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान जालंधर जिल्ह्यात अमृतपालसिंगचा ताफा पोलिसांनी अडवला होता. त्या वेळी तो निसटला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंजाबमधील सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. पंजाबमधील इंटरनेट व एसएमएस सेवा बंद करण्यात आली असली, तरी ब्रॉडबँड इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे बँका, रुग्णालये आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे पंजाबच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *