Saptashrungi Devi Chaitrotsav: आदिमाया सप्तशृंगीचा 30 पासून चैत्रोत्सव; खानदेशातील भाविकांची असणार रेलचेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ मार्च । उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरुपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर आदिमाया सप्तशृंग देवीच्या चैत्रोत्सवास चैत्र शु. ९ अर्थात रामनवमी ३० मार्चपासून सुरवात होत आहे. चैत्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. (Chaitrotsav of Adimaya Saptashrungi from 30th march nashik news)

खानदेशाची माहेरवासिन समजल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला ३० मार्च अर्थात चैत्र शुद्ध ९ पासून ते चैत्रोत्सव चैत्र शुध्द १५ चैत्र पौर्णिमा समाप्ती पर्यंत अर्थात ६ एप्रिल या दरम्यान चालणार आहे.

या यात्रेसाठी खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह कसमादे भागातील लाखो भाविक परंपरेने दरवर्षी पायी गडावर येतात. चार ते आठ दिवसांचा प्रवास करीत हे भाविक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत गडाकडे पदयात्रेने मार्गक्रमण येत असतात.

चैत्रोत्सव कालावधीमध्ये श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे तसेच विविध धर्मिक संस्थांतर्फे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आहे. याच कालावधीमध्ये विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे.

चैत्र शु. ९ अर्थात रामनवमी श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सातला होणार आहे. दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. चैत्रोत्सव काळात दररोज सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल.

नवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या मंगळवारी (ता.४) सकाळी सातला पंचामृत महापूजा, दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पूजन, त्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगाव गवळी पाटील कुटुंबियाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल. तत्पूर्वी ध्वजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल.

याच दिवशी रात्री बाराला श्री भगवती शिखरावर कीर्तीध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहण करतील. गडावर बुधवारी (ता.५) सकाळी ९.१८ वाजेपासून चैत्र पौर्णिमा प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. गुरुवारी (ता.६) सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. सकाळी १०.३० ला चैत्र पौर्णिमा समाप्त होऊन चैत्रोत्सवाची सांगता होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *