राजकीय भूकंप:महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची चर्चा ; भाजप हायकमांड एकनाथ शिंदेंवर नाराज ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २६ एप्रिल । मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांची लवकरच उचलबांगडी होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजप हायकमांड एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे समजते. त्यामुळे त्यांची गच्छंती अटळ असल्याचे वृत्त आहे. सध्या एकनाथ शिंदे सुटीवर आहेत. त्यामागे त्यांची नाराजी असल्याचे समजते. यावर शिंदे गटातले नेते वेगवेगळी वक्तव्ये देत आहेत. तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आपण सुटी घेतलेली नाही. अनेकांना सुटीवर पाठवल्याचे म्हटले आहे.

ताळमेळ नसल्याचे उघड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत. त्यात ते अचानक चार दिवसांच्या सुटीवर गेले. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली. शिंदे गटाच्या मंत्र्यांना या प्रकरणी सारवासावर करताना नाकी नऊ आली. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण सुटीवर नसल्याचे म्हणाले. त्यामुळे शिंदे गटातच ताळमेळ नसल्याचे समोर आले.

राजीनामा तयार ठेवा

दुसरीकडे भाजपचे दिल्लीतले हायकमांड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याचे समजते. सध्या सर्वोच्च न्यायालयातली सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. त्याचा निकाल कधीही येऊ शकतो. या निकालात आमदार अपात्रतेचा निर्णय आला, तर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घेण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांना राजीनामा तयार ठेवा, अशा सूचना दिल्याचे समजते.

शिंदे एकाकी पडले

महाराष्ट्रातून प्रकल्प गेल्याची जोरदार चर्चा झाली. विरोधक अजूनही वेदांता, फॉक्सकॉन प्रकल्पावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरतात. त्यात महाराष्ट्र भूषण सोहळ्यात चौदा भाविकांना जीव गमावावा लागला. या प्रकरणाचे खापरही शिंदे गटावर फोडण्यात आले. या प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांनाही शिंदे गटाला तोंड द्यावे लागले. या साऱ्या प्रकरणावरून एकनाथ शिंदे एकाकी पडल्याचे समजले जात आहे.

राजकीय लाभ नाही

भाजपने एकनाथ शिंदे यांना मराठा नेता म्हणून हेरले. पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते भाजप आणि शिंदे गटाला सहकार्य करतील किंवा गळाला लागतील अशी अपेक्षा भाजप हायकमांडला होती. मात्र, ठाणे आणि पालघरच्या पुढे एकनाथ शिंदे गेले नाहीत. त्यामुळे भाजपचे हायकमांड त्यांच्यावर खप्पा मर्जी असल्याचे समजते.

अपेक्षांची अपूर्ती

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडे सहानुभूती वळली. त्यात ग्रामपंचायत, नगरपरिषद निवडणुकांमध्ये शिंदे गटाने म्हणावा तसा प्रभाव दाखवला नाही. लोकाभिमुख निर्णय घेण्यातही ते कमी पडले. त्यांच्यासोबत निवडणुका लढलो, तर काही खरे नाही. अशी भावना भाजप हायकमांडच्या मनामध्ये तयार झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *